रंगरसिया
कलाकार : रणदीप
हुडा, नंदना सेन, फेरेना वजीर, परेश रावल, विक्रम गोखले, दर्शन जरीवाला,
गौरव द्विवेदी, विपीन शर्मा, सुहासिनी मुळ्ये, आशिष विद्यार्थी इत्यादी
निर्माता : दीपा साही व आनंद महेंद्रू
दिग्दर्शक : केतन मेहता
Star Cast
- Randeep Hooda.... Raja Ravi Varma
- Nandana Sen.... Sugandha
- Paresh Rawal.... Govardhan Das
- Aashish Vidyarthi.... Guest Appearance
- Sachin Khedekar.... Guest Appearance
- Darshan Jariwala
- Jim Boeven.... Fritz
- Prashant Narayanan.... Guest Appearance
- Rajat Kapoor.... Guest Appearance
- Vikram Gokhale.... Lawyer
- Suhasini Mulay
- Tom Alter
- Vipin Sharma
- Chirag Vohra.... Phalke
- Rashaana Shah.... Kamini
- Gaurav Dwivedi.... Raj Varma
- Ferena Wazeir.... Frenny
- Tripta Parashar.... Poorutarthy
- Sameer Dharmadhikari.... Sayaji Rao Gaekwad
- Sri Vallabh Vyas.... Raj Varma
- Yashvardhan Kumar.... Young Ravi Varma
मी रणजित देसाईंची कादंबरी वाचलेली नाही. त्यामुळं इथं दोहोंची तुलना न करता, फक्त सिनेमावरच बोलू. (या चित्रपटातील व्यक्तिरेखांचा वास्तवातील कोणत्याही व्यक्तींशी संबंध नाही, हे सुरुवातीचं डिक्लअरेशन सूचक आहे.) एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतात जवळपास प्रत्येक घरात रविवर्मा यांनी चितारलेल्या देवदेवतांची चित्रं पोचली होती. सर्वाधिक सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचलेला हा सर्वांत लोकप्रिय चित्रकार होता. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आधुनिक भारतात, कलेच्या प्रांतात स्वयंघोषित संस्कृतिरक्षकांची राळ झेलावी लागली ती रविवर्मांना आणि कलाकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ठाम बाजू घेणारे पहिले कलाकारही रविवर्माच. त्यांचं हे योगदान आधुनिक भारताच्या कला क्षेत्रासाठी केवळ अतुलनीय असंच आहे. केरळमधील त्रावणकोर संस्थानातील किलिमानूर या लहान गावी वाढलेला, जन्मतःच रंगरेषांची विलक्षण जाण असलेला हा रविवर्मा तेथील कलाप्रेमी राजाच्या उदार आश्रयामुळं आपली कला चांगल्या पद्धतीनं जोपासू शकला. याच राजानं रविवर्मांना राजा हा किताब बहाल केला. मात्र, त्या राजाच्या निधनानंतर राजाच्या भावाला रविवर्माविषयी असलेल्या द्वेषामुळं त्याला संस्थान सोडावं लागलं. रविवर्मा आपल्या भावासह मुंबईत आले. बडोदा संस्थानचे महाराजे सयाजीराव गायकवाड यांच्यामुळं रविवर्मांना मुंबईत बस्तान बसवता आलं. त्यांच्यामुळंच देशभर फिरून या महान देशात घडून गेलेल्या अनेक लोककथा, संस्कृती-परंपरा, महाकाव्यांचा अभ्यास करता आला. त्यातूनच पौराणिक चित्रं काढण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. रविवर्मा यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया आणि त्यांचे भावोत्कट संबंध हाही एक निराळा पैलू आहे. व्यावहारिक जगात त्यांची होणारी फरफट, तथाकथित संस्कतिरक्षकांकडून होणारी अवहेलना, मानहानी, कोर्टकज्जे हे सगळे भोग रविवर्मांनी भोगले. शेवटी देह गेला, पण सर्वसामान्य माणसाच्या घरात विराजमान झालेली अब्जावधी देवतांची चित्रांच्या रूपानं ते अजरामर झाले.
कलाकाराचं हे अस्वस्थ, पण चैतन्यमय जगणं एक कलाकारच चितारू शकतो. केतन मेहतांकडं ती दृष्टी आहे. त्यामुळं त्यांनी हे आव्हान उत्तम रीतीनं पेललं आहे. या सिनेमाचं प्रॉडक्शन डिझाइन, कला दिग्दर्शन अप्रतिम आहे. साधारण १८९० ते १९०५ या काळातल्या मुंबईचं यात होणारं दर्शन विलोभनीय आहे. तत्कालीन राजकीय संदर्भ, सामाजिक परिस्थिती यांचं नेपथ्य अचूक आहे. लोकमान्य टिळक, दादासाहेब फाळके, सयाजीराव यांच्यासारख्या समकालीन व्यक्तिमत्त्वांची उपस्थितीही आवश्यक, सूचक आणि सुखद आहे. काँग्रेसच्या एका समारंभात लोकमान्य टिळक भाषण करीत असताना, रविवर्मा 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या फ्रेनी या पत्रकाराशी 'आँखमिचौली' करतात हा प्रसंग किंवा मुंबईतील कॉरोनेशन थिएटरमध्ये ल्युमिए बंधूंनी १८९६ मध्ये दाखवलेली 'दी अरायव्हल ऑफ ट्रेन' हा जगातली पहिली हलती चित्रं आणि त्याला रविवर्मा व फाळकेंची उपस्थिती किंवा कोर्टातील सर्वच प्रसंग मेहतांच्या कल्पक दिग्दर्शनाची साक्ष देतात.
अर्थात 'कलाकार रविवर्मा' दाखवताना मेहता खरे खुलले आहेत आणि तोच या सिनेमाचा गाभा आहे. सुरुवातीला पत्नीच्या घरातील कामिनी ही अस्पृश्य नोकर स्त्री आणि नंतर मुंबईत सुगंधा ही वेश्या या दोघी रविवर्मांच्या मॉ़डेल बनल्या. या दोघींची चित्रं रविवर्मा काढत असतानाचे सर्वच्या सर्व प्रसंग अफलातून झाले आहेत आणि त्यासाठी मेहतांच्या सौंदर्यदृष्टीला सलाम केला पाहिजे. विशेषतः सुगंधाला सरस्वती म्हणून मॉडेल करताना रविवर्मा तिची मनोभावे पूजा करतात तो प्रसंग आणि नंतर उर्वशी-पुरुरवाची गोष्ट सांगून हे चित्र काढण्यासाठी मला कोण मॉडेल मिळणार, असं रविवर्मांनी विचारल्यानंतर सुगंधाचं अनावृत होऊन त्यांच्यासमोर उभं राहणं आणि हे चित्र पूर्ण झाल्यावर दोघांचंही अनावृत होऊन एकमेकांत रंग होऊन मिसळून जाणं हे केतन मेहतांनी ज्या पद्धतीनं दाखवलं आहे, ते केवळ अप्रतिम. (यात कुणाला अश्लीलता दिसल्यास तो दोष मेहतांचा नव्हे; पाहणाऱ्याच्या नजरेचा असेल. कारण 'नंदना सेन हिनं 'रंगरसिया'त कसला टॉपलेस शॉट दिला आहे,' अशीच याची आपल्याकडं चर्चा होणार, याची मला खात्री आहे. ज्या दिवशी समस्तांच्या डोळ्यांना त्यापलीकडची कला दिसेल, त्या दिवशी रविवर्मांपासून अनेकांची पितरं स्वर्गात जातील. असो.)
रणदीप हुडा यानं रविवर्मांच्या भूमिकेत झोकून देऊन काम केलं आहे. कुठलीही सुंदर गोष्ट पाहिली, की एका चित्रकाराच्या डोळ्यांत ती लगेच कागदावर उतरविण्याविषयीची एक चमक दिसते, ती रणदीपनं त्याच्या डोळ्यांतून फार सुंदर व्यक्त केली आहे. रविवर्मा संपूर्ण देशभर फिरतात, तेव्हा त्या-त्या ठिकाणचे होऊन राहतात. मेहतांनी एका गाण्यातून हा सर्व प्रवास दाखवला आहे. त्यात वाराणसीत गंगेच्या घाटावर एका साधूबरोबर गांजा ओढून धुंदीत नाचतानाचं दृश्य रणदीपनं मस्त दिलंय. शेवटचा कोर्टातला प्रसंग आणि त्या वेळचं रविवर्मांचं भाषण हा या सिनेमाचा एक उत्कर्षबिंदू आहे. त्या वेळीही रणदीपचा अभिनय पाहण्यासारखा आहे. ते भाषण तर मुळातच ऐकण्यासारखं आहे. त्याच्या कारकिर्दीतील ही महत्त्वाची भूमिका ठरावी. डॉ. अमर्त्य सेन यांची कन्या नंदना सेन हिनं सुगंधाची भूमिका फारच सुंदर साकारली आहे. स्त्रीची कलाकाराकडं पाहण्याची एक वेगळी दृष्टी तिचं पात्र प्रेक्षकांना देतं. नंदनाचं वेगळ्या प्रतीचं सौंदर्य रविवर्म्याप्रमाणंच मेहतांच्या कॅमेऱ्यानंही झकास टिपलंय. फ्रेनीच्या भूमिकेत फेरेना वजीर खूप सुंदर दिसलीय. बाकी रविवर्मांचे बिझनेस पार्टनर असलेल्या गोवर्धन दासच्या भूमिकेत परेश रावल, धर्ममार्तंड चिंतामणी महाराजांच्या भूमिकेत दर्शन जरीवाला, वकिलाच्या भूमिकेत विक्रम गोखले आदींनीही आपापल्या कामे नेहमीप्रमाणेच छान केलीयत. संदेश शांडिल्य यांचं संगीतही या कलाकृतीला पूरक असंच आहे. थोडक्यात, या रंगांत हरवून जा. चित्रकलेविषयी आणि एकूणच कलेविषयी एक वेगळं भान आपल्यात येऊ शकेल.
No comments:
Post a Comment