ओबामा तर चर्चचं बाहुलं- विहिंप

obama1


भारतातील धार्मिक असहिष्णुतेवर टिप्पणी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे चर्चच्या हातातील बाहुलं असल्याचा टोला विश्व हिंदू परिषदेनं हाणला आहे. ओबामांनी आधी अमेरिकेत कृष्णवर्णियांवर होणारे अत्याचार थांबवावेत, मग भारताविषयी बोलावं, अशी चपराकही त्यांनी लगावली आहे.

गेल्या काही वर्षांत भारतामध्ये धार्मिक असहिष्णुता वाढली आहे. एखाद्या धर्माच्या श्रद्धेला इतर धर्मियांनी लक्ष्य केल्याचे प्रकार घडलेत. ही परिस्थिती पाहून महात्मा गांधींनाही जबर धक्का बसला असता, असं वादग्रस्त निरीक्षण नोंदवून बराक ओबामा यांनी परवाच नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला होता. त्यांचं हे मत ऐकून केंद्रातील बडे अधिकारीही चक्रावलेत. ख्रिश्चन लॉबीला खुश करण्यासाठीच त्यांनी ही टिप्पणी केल्याची कुजबूज काल प्रशासकीय वर्तुळात होती. अगदी परराष्ट्र खातं आणि पीएमओचे अधिकारीही याकडे, ओबामांची 'राजकीय अपरिहार्यता' म्हणूनच पाहत होते. अर्थात, त्यांच्यापैकी कुणीच जाहीरपणे काही बोललं नाही, पण विहिंपचे सहसरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी ओबामांवर टीकास्त्र सोडलं.

बराक ओबामांनी आधी आपल्या देशातील परिस्थिती तपासावी. ते स्वतः कृष्णवर्णीय असूनही अमेरिकेतील कृष्णवर्णियांवर अन्याय-अत्याचार सुरूच आहेत. ते आधी थांबवा, नाहीतर भारताला सल्ले देण्याच्या फंदात पडू नका, असं जैन यांनी सुनावलंय. ओबामांवर ख्रिस्ती मिशनरींचा प्रभाव आहे. किंबहुना, चर्चच्याच पाठिंब्यावर ते राजकारण करताहेत. ते त्यांच्याच हातातील बाहुलं आहे, असा टोमणाही त्यांना मारला. अमेरिका ख्रिश्चनांची चिंता कायमच वाहते. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविषयी ते कधीच काही बोललेले नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. भारत दौऱ्यावर आलेल्या ओबामांनी ख्रिस्ती धर्मप्रसारकांना धर्मांतर थांबवण्याची सूचना करायला हवी होती, पण या गंभीर मुद्द्यावर त्यांनी मौनच बाळगल्याचंही त्यांनी नमूद केलं.

No comments:

Post a Comment