हॅपी जर्नी - Happy Journey - Movie Review

 happyjourney
हॅपी जर्नी
कलाकार : अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, पल्लवी सुभाष, माधव अभ्यंकर, सुहिता थत्ते, चित्रा पालेकर, सिद्धार्थ मेनन, शिव सुब्रह्मण्यन, मदन देवधर आदी.
निर्माता : संजय छाब्रिया
दिग्दर्शक : सचिन कुंडलकर
संगीत : करण कुलकर्णी
वेळ : 130mins
सिनेमा प्रकार : Drama


सचिन कुंडलकर दिग्दर्शित 'हॅपी जर्नी' हा नवा मराठी चित्रपट म्हणजे बहीण-भावाच्या तरल नात्यावर भाष्य करणारी एक अद्'भुत' सफर आहे. किंबहुना या प्रातिनिधिक नात्याच्या माध्यमातून सर्वच नातेसंबंधांवर आणि ती जपण्यावर एक सब्-टल टिप्पणी आहे. सिनेमा तंत्राची सर्व बलस्थानं वापरून, फँटसीच्या अंगानं जाणारी ही म्हटलं, तर एक रोड मूव्ही आहे; म्हटलं तर एक विनोदाचा प्रसन्न वापर असलेली कौटुंबिक कहाणी आहे! कॅराव्हॅनचा एक पात्र म्हणून वापर करण्यासारखा सचिन कुंडलकरचा खास टच अनेक प्रसंगांतून जाणवत असला, तरी ही त्याची सर्वोत्कृष्ट कलाकृती होता होता राहिली आहे, हेही नमूद करायला हवं.

निरंजन (अतुल कुलकर्णी) आणि त्याची बरीच धाकटी बहीण जानकी (प्रिया बापट) यांची ही गोष्ट आहे. गोव्यातल्या निसर्गरम्य गावात घडणाऱ्या या सिनेमात सुरुवातीला निरंजन दुबईहून येतो, तेव्हा त्याच्या धाकट्या बहिणीचं निधन झालेलं असतं. रक्ताच्या कर्करोगानं गेलेली त्याची बहीण शेवटपर्यंत त्याच्या नावाचा जप करीत असते. निरंजन सैरभैर होतो. त्यानंतर सुरू होतं एक अदभुत नाट्य. बहीण-भावांच्या अनोख्या प्रेमाचं, तितकंच उत्कट... तेवढंच धमाल अन् तेवढंच हळवं! हा पुढं घडणारा बहीण-भावांचा प्रवास आणि त्यातून उलगडत जाणारी गोष्ट म्हणजे 'हॅपी जर्नी'... माणसं असतात तेव्हा आपल्याला त्यांची किंमत नसते. पण ती एके दिवशी अचानक जातात, पुन्हा कधीही न येण्यासाठी. मग आपल्याला आठवतं, की त्याच्याबरोबर किंवा तिच्याबरोबर आपण अनेक गोष्टी करायच्या राहून गेल्या. गप्पा मारायच्या होत्या, मस्त भटकायचं होतं, एकत्र आइस्क्रीम खायचं होतं, धमाल करायची होती. आपण त्यांच्यासाठीच राबत असतो दूर कुठं तरी. त्यामुळं इच्छा असूनही या गोष्टी करता येत नाहीत आणि दोन्ही ​जिवांची तगमग सुरू होते. 'हॅपी जर्नी' आपल्याला आपल्या जवळच्या या नात्यांकडं पुन्हा पाहायला लावतो. आपण आपल्या बहिणीबरोबर शेवटच्या निवांत गप्पा केव्हा मारल्या, आपण आपल्या भावाबरोबर मनसोक्त दंगा कधी गेला... हे आठवू लागलं की अनेकांना लक्षात येईल, की याला युगं लोटली! आपण सध्या नक्की काय करतोय आणि आपण त्यामुळं काय 'मिस' करतोय, याची बोचरी जाणीव आपल्याला हा सिनेमा करून देतो.असं असलं, तरी बहीण-भावाच्या पारंपरिक नात्यांवर घाऊक रडायला लावणारा हा अश्रुपाती सिनेमा नाही. यातली पात्रं खऱ्याखुऱ्या माणसांसारखी वागतात. त्यांचं जगणं साधं असलं, तरी त्याला हसण्याची, विनोदाची चांगली किनार आहे. ते स्वतःवर हसू शकतात, रडू शकतात. एकत्र बिअर पिऊ शकतात, गर्लफ्रेंडशी बोलताना अडखळू शकतात... सचिनच्या संवादांनी यात मजा आणली आहे. 'अन्न-वस्त्रं-निवारा अन् वायफाय हे मला लागतंच' किंवा (निरंजन त्याची प्रेयसी अॅलिसच्या संदर्भात बोलताना) 'अॅलीस तर अॅलीस नाही तर गेलीस उडत' असे संवाद हशा पिकवतात.


असं असलं, तरी या सिनेमात सगळंच आलबेल नाही. विशेषतः उत्तरार्धात अनेक ठिकाणी अडखळायला होतं. निरंजनच्या प्रेयसीचा आणि तिच्या घरच्यांचा ट्रॅक या कालावधीत मोठा होत जातो आणि मूळ बहिणीची गोष्ट थोडी बाजूला पडते. निरंजन आणि त्याच्या बहिणीच्या प्रवासाची सुरुवातीला गंमत येते. पण त्यातला फँटसी एलिमेंट संपूर्णपणे एक्स्प्लोअर होतो, असं वाटत नाही. यातल्या त्या किंचित रहस्यामुळं सगळ्या गोष्टी इथं स्पष्टपणे लिहिता येत नाहीत. पण सुरुवातीला खिळवून ठेवणारी ही गोष्ट नंतर नंतर तेवढी गुंतवून ठेवत नाही, एवढं खरं.

अतुल कुलकर्णीचा प्रश्नच नाही; पण प्रियानं 'जानकी' खूपच गोड साकारली आहे. पल्लवी सुभाष आणि सिद्धार्थ मेनन या दोघांनीही अतुलच्या गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडच्या भूमिकेत साथ दिली आहे. पल्लवी सुभाषनं यात कॅथॉलिक ख्रिश्चन मुलीची भूमिका केली असली, तरी तिचे मराठी उच्चार त्या भूमिकेनुसार मुद्दाम खराब ठेवले आहेत, की ती नैसर्गिकरीत्याच तसं बोललीये हे कळायला मार्ग नाही. (काहीही असलं, तरी काचेवर करकटकनं ओरखडा काढल्यावर येतो, तसा शहारा तिचं ते मराठी ऐकताना येतो.) बाकी भूमिकांत माधव अभ्यंकर, सुहिता थत्ते ठीकठाक. पल्लवी सुभाषच्या अत्रंगी आई-वडिलांच्या भूमिकेत शिव सुब्रह्मण्यन ('टू स्टेट्स'मधले आलिया भटचे वडील) आणि चित्रा पालेकर यांनी धमाल उडवली आहे. या सिनेमात खास डिझाइन करून घेतलेली व्हॅन आहे.

सिनेमात दोन-तीन गाणी आहेत. करण कुलकर्णी या नव्या संगीतकाराचं संगीत आहे. ही गाणी सिनेमात चांगली वाटतात; पण लक्षात राहिली नाहीत. सिनेमॅटोग्राफी उत्कृष्ट दर्जाची आहे. सिनेमातून दिसणारा गोवा अप्रतिम. तेव्हा, एकदा या सफरीला जायला हरकत नाही. हॅपी जर्नी!

No comments:

Post a Comment