Marathi story of Film Industry
फिल्म इंडस्ट्री म्हणजे दुसरी ‘लव्ह
इंडस्ट्री’ म्हणायला हवी. ‘दिलके बीमार’ इथे ज्या प्रमाणात आढळतील तेवढे
इतर कुठेही आढळणार नाहीत! पण म्हणून यांना कोणत्याही रुग्णालयात जाण्याची
गरज भासत नाही. कारण यांच्या दिलका इलाज ते स्वतःचा स्वतःच करीत असतात. एका
वॉर्डात दिल तुटलं की दुसर्या वॉर्डात नवीन दिल हाजीर असतं. इतक्या
सहजपणे इथे हृदयावर नवीन आवरणं चढवली जातात. बरं, हृदय तुटलं-फुटलं,
चकनाचूर झालं म्हणून कुणी हिरोनी आत्महत्या केली आहे किंवा तो वेडा झाला
आहे, तर असंही होत नाही. कारण यांची हृदयं खानदानी दणकट असतात. त्यातून जर
ते कपूर खानदानाचं हृदय असेल, तर त्यात लाल रंगाचं अमृत असणार. त्यामुळे ते
कायम प्रेमात आकंठ बुडालेलंच असणार. त्या हृदयातील प्रेमाचा झरा कधीच
आटणार नाही आणि त्यात इतके कप्पे असण्याची शक्यता असते की, एका वेळी
तीन-चार आशुका-माशुका सहज राहू शकतात! अशा रंगेल, दिलछबू, आशिकमिजाजांपैकी
एक शम्मी कपूर!
शम्मी कपूरची पडद्यावरील प्रेमळ अदा पाहून
नायिकांना धक्काच बसत असे. इतका तो आक्रमकपणे त्यांच्यावर झेप घेत असे आणि
प्रत्यक्षातही तो तसाच होता. कारण वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षीच
शम्मीला नायक होण्याचं भाग्य लाभलं होतं. चित्रपट होता ‘जीवन-ज्योती’ आणि
त्याची नायिका होती ‘चांद उस्मानी.’ त्याच वयात त्याचं प्रेमप्रकरण सुरू
होतं ते एका इजिप्शियन बेलो डान्सरशी, जी इजिप्तची चित्रपट नायिकाही होती.
आता, इजिप्त कुठे? इंडिया कुठे? पण, शम्मी एका सुटीसाठी म्हणून श्रीलंकेत
फिरायला गेला, तिथं त्याला ही ‘इजिप्शियन ऍक्ट्रेस’ ‘नादिया गमाल’ भेटली
आणि दोघंही ‘दिलके बीमार’ झाले. हे प्रेमप्रकरण टिकलं फक्त दोन वर्षं.
त्यानंतर १९५५ साली ‘रंगीन राते’ नावाचा चित्रपट करीत असताना त्यात गीता
बाली पाहुणी कलाकार म्हणून काम करत होती. झालं. शम्मी तिच्यापाठी हात धुवून
लागला. त्या वेळी शम्मी कपूर कुणी यशस्वी नायक नव्हता, पण गीता बालीचं
मात्र तेव्हा बर्यापैकी नाव झालं होतं. १९५० पासून तिने नायिकेच्या भूमिका
करायला सुरुवात केली होती. वयाच्या बाराव्या वर्षी तिने बाल कलाकार म्हणून
काम केलं. शम्मी कपूरच्याही आधी तिने राज कपूरबरोबर ‘बावरे नैन’मध्ये काम
केलं होतं, तर ‘आनंदमठ’ चित्रपटात ती पृथ्वीराज कपूरबरोबर होती. तोपर्यंत
शम्मी-गीताचा एकही चित्रपट आला नव्हता. मात्र, तरीही या ‘पाहुणी’च्या मागे
शम्मी असा काही लागला की, ती त्याच्या प्रेमात पडली. लगेच शम्मीने तिला
लग्नासाठी विचारलं, पण तिने लग्नाला मात्र नकार दिला. कारण ती शम्मीपेक्षा
एका वर्षाने मोठी होती आणि याआधी तिने आपल्या होणार्या सासर्या व
दिरांबरोबर नायिकेची भूमिका केली होती. शम्मीला मात्र ही कारणं काही पटत
नव्हती. त्याने आपला प्रेमाचा रियाज चालूच ठेवला आणि ती भेटली रे भेटली की
लग्नाचं विचारायचा. एकदा शम्मीच्या घरचे सर्व बाहेर गेले असताना गीता बाली
त्याला भेटायला आली, त्याने तिला पुन्हा लग्नाचं विचारताच ती म्हणाली की,
हो, मी करेन, पण एकाच अटीवर. लग्न आत्ताच्या आत्ता, आजच व्हायला हवं. आता
इतक्या तडकाफडकी लग्न कसं करायचं? शम्मीला जॉनी वॉकरची आठवण झाली. कारण,
आठवडाभरापूर्वी जॉनीने पळून घाईघाईत लग्न केलं होतं. त्याने मशिदीत लग्न
केलं, कारण तो मुस्लिम होता. शम्मीला त्याने देवळात जायला सांगितलं. लगेच
शम्मीने आपला जीवलग मित्र हरी वालियाला मदतीस घेऊन ते तिघं बाणगंगा येथील
देवळात गेले, परंतु तोपर्यंत रात्र झाली होती आणि देऊळ बंद झालं होतं.
पुजारी जरी जागे असले तरी देव झोपले होते. यांची तर पंचाईतच झाली.
पुजार्यांनी त्यांना दुसर्या दिवशी पहाटे येण्यास सांगितले. उतावळे
वधू-वर नाइलाजाने रात्री परत शम्मीच्या घरी मुंबईतील माटुंगा येथे आले.
रात्रभर जागले आणि शूटिंगला कधी वेळेवर न पोहोचणारे हे ‘फिल्मी प्रेमी’
अगदी पहाटे पहाटे ४ वाजता बाणगंगा वाळकेश्वर येथील देवळात पोहोचले.
पुजार्यांनी रीतसर अग्नीस साक्षी ठेवून त्यांच्याकडून सात फेरे करवून
घेतले. एकमेकांनी एकमेकांच्या गळ्यात हारही घातले, परंतु ‘सिंदूर’ नेमका
त्या वेळी संपला होता. म्हणून गीता बालीने आपल्या पर्समधील लिपस्टिक काढली
आणि शम्मीने ती तिच्या भांगेतून ओढली व तिची मांग सिंदूरने भरली.
प्रसंगावधान राखणं म्हणतात ते याला! दिग्दर्शकाशिवाय शम्मी कपूर-गीता
बालीचा हा विवाहसोहळा अडथळे पार करून २३ ऑगस्ट १९५५ रोजी पहाटे संपन्न झाला
आणि चार महिन्यांच्या अथक इश्कबाजीनंतर शम्मीच्या जीवनात गीता आली.
शम्मी कपूरला तेव्हा अभिनय आणि नृत्याची
लय सापडत नव्हती. मधुबालासोबत ‘रेल का डिब्बा’, श्यामाबरोबर ‘ठोकर’, नलिनी
जयवंतबरोबर ‘हम सब चोर है’, सुरय्यासोबत ‘शमा परवाना’ असे चित्रपट आले.
परंतु, शम्मीची चमक दिसली नाही. त्याने गीता बालीचा सल्ला घेतला. गीता
बालीने तोपर्यंत त्याच्याबरोबर १९५५ साली एकच चित्रपट केला होता, त्याची
‘अदा’ तिने पाहिली होती. म्हणून तिने त्याला एकच सुचवलं की, इतरांपेक्षा
काहीतरी वेगळं कर, तुझी नृत्यशैली तू बदलून बघ आणि शम्मीने पत्नी गीता
बालीचा सल्ला मानला. १९५७ साली ‘तुमसा नही देखा’ प्रदर्शित झाला होता,
त्यातील त्याची नृत्यशैली एकदम वेगळी होती. त्यानंतर आलेला ‘दिल देके देखो’
तर खूपच गाजला. शम्मीचा अभिनय म्हणजे चपळाईने सादर केलेले नृत्य आणि तीच
त्याच्या चित्रपटाची जादू होती. झालं. शम्मीच्या यशस्वी चित्रपटांची यादी
वाढतच गेली. रंगीत जंगलीने तर अक्षरशः कहरच केला. ही कमाल गीता बालीच्या
सल्ल्याची. गीता बालीबरोबर त्याने ‘मिस कोका कोला’ (१९५५), ‘कॉफी हाऊस’
(५७), ‘मुजरीम’ (५९), ‘मोहर’ (५९), ‘जबसे तुम्हे देखा हैं’ (६३) असे
चित्रपट केले. २१ जानेवारी १९६५ रोजी गीता बाली ‘देवी’ (कांजण्या)च्या
आजारामुळे मृत्युमुखी पडली. आदित्य आणि कांचन- गीता बाली, शम्मीची मुलं.
त्यांचा संसार दहा वर्षं टिकला. कपूर खानदानातील सुनेने लग्नानंतर सिनेमात
काम करायचे नाही, या नियमाचे गीता बालीने उल्लंघन केले आणि आपली
सिनेकारकीर्द सुरूच ठेवली आणि कुणीही तिला विरोध केला नाही.
१९६९ साली शम्मी कपूरने ‘नीला देवी’ या
तरुणीशी विवाह केला. तरीही त्यानंतर शम्मीची प्रेमप्रकरणं सुरूच होती.
प्रथम पदार्पण करणार्या बहुतेक नायिकांची सुरुवात शम्मी कपूरपासून होत
असे. आशा पारेख, सायरा बानू, शर्मिला टागोर अशा नायिकांशी ‘रोमान्स’
करताना, त्यांच्यापेक्षा वयाने बराच मोठा व थोराड वाटणार्या शम्मीला
प्रेक्षकांनी शिट्ट्यांची दाद देऊन स्वीकारलं. आपल्या सुनेबरोबरही प्रणय
प्रसंग रंगविण्याची ‘डेअरिंग’ कपूरकरच करू शकतात! शम्मीने बबिताबरोबर असे
सीन केले आहेत, तर शशी कपूरने नीतू सिंगबरोबर ‘रोमान्स’ केला आहे. मुमताजला
तिच्या ‘उमेदवारीच्या काळात’ ‘पाठिंबा’ देऊन तिला बड्या बॅनरचे चित्रपट
मिळवून देण्यात शम्मीचा हिस्सा फार मोठा आहे.
प्रेमप्रकरण, मदिरा, चित्रपटातील
नायिकांचे ओलेते सीन यांना ‘प्रतिष्ठा’ मिळवून देण्याची फार मोठी कामगिरी
कपूर कुटुंबीयांनी केली आहे. त्यामुळे त्यानंतर अशी दृश्यं चित्रपटातून
सर्रास आणि ‘कलात्मक’ दृश्य म्हणून चित्रित करण्याची ‘प्रेरणा’ अनेकांना
लाभली ती ‘कपूर’ फिल्मस्च्या चित्रपटांमुळे! सिनेमा आपल्याला विविध
गोष्टींची शिकवणी देत असतो. आपला ‘क्लास’ काय, यावर ती प्रेरणा आणि आदर्श
अवलंबून असतो. सर्वसामान्य प्रेक्षकांना कौतुक वाटतं ते मात्र या नायक आणि
नायिकांच्या पडद्यावरील आणि पडद्यामागील रोमान्सचं आणि आकलन होत नाही ते
एका गोष्टीचं ते म्हणजे, या नायक-नायिकांचे प्रेम जमतं, तुटतं, जमतं,
प्रेमभंग होतो, लग्न होते, एखाद्या वर्षात घटस्फोट होतो, पुन्हा लगेच लग्न
होतं... हा गुंता ते कसे सोडवतात? त्यात गुरफटून यांना ‘डिप्रेशन’ कसं येत
नाही? ही फिल्लमवाल्यांची ‘दिल की बिमारी’ आहे मनोरंजक, यांच्या
सिनेमापेक्षा तीच ऐकायला मजा येते. यांच्या प्रत्येकाच्या जीवनावर एकेक
चित्रपट सहज निर्माण होऊ शकेल.
No comments:
Post a Comment